नालासोपारा - वसई रोड स्थानकावरून सकाळी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करून ती १ नोव्हेंबरपासून विरारहून सोडण्यात येत असल्यामुळे सद्या वसईतील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण गेली सहा वर्षे ही लोकल वसई रोडवरून सकाळी ९.५७ वाजता सोडली जात होती. या लोकलमधून कमी प्रवासी प्रवास करतात असा रेल्वेने सर्व्हे करून शोध लावला होता. रेल्वे अधिकारी जुमानत नसल्यामुळे रविवारी या महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळाने वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत त्यांना ही लोकल पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करा म्हणून विनंती केली. यावेळी आ. क्षितिज ठाकूर हे देखील उपस्थित होते.गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड स्थानकावरून महिला विशेष लोकल सोडण्यात येत होती. मात्र अचानक ती नोव्हेंबर महिन्यापासून रद्द करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. या विशेष महिला लोकलमधून विरारच्या महिला प्रवाशांनाही प्रवास करता यावा म्हणून ती विरार स्थानकातून १ नोव्हेंबर पासून सोडली जाऊ लागली. मात्र विरार, नालासोपारा स्थानकावरून ती पूर्ण भरून येत असल्यामुळे वसई रोड, नायगांव व भार्इंदर स्थानकावरील महिला प्रवाशांना डब्यात चढताना अग्नीदिव्यातून जावे लागत असे. पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी व रेटारेटीत एका महिलेला अस्थमाच्या अटॅक आल्याने ती गुदमरली होती.महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळाने याबाबत रविवारी दुपारी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार पश्चिम येथील विवा महाविद्यालयातील कार्यालयात भेट घेऊन आपले निवेदन दिले. पश्चिम रेल्वेचे विभागिय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनाही याबाबत निवेदन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही आमदारांनी याबाबत पुढाकार घेऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी विनंती केली. ठाकूर यांनी याबाबत लवकरच रेल्वेच्या अधिका-यांशी ही महिला विशेष लोकल पूर्ववत वसई रोड स्थानकावरून सोडण्यात यावी म्हणून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. याबाबत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधून चर्चा करणार असल्याचे सांगितले.वसईतील महिला प्रवाशांच्या समस्यांबद्दल रेल्वेच्या अधिका-यांसोबत लवकरच या विषयासंदर्भात तोडगा काढण्यासाठी चर्चा करू.ही लोकल पुन्हा वसई रोड स्थानकावरून सुटणारी म्हणून प्रयत्न करू.- हितेंद्र ठाकूर, आमदार वसईरेल्वेने चुकीचा सर्व्हे करून आम्हा महिला प्रवाशांची करुन चेष्टा केली आहे. आमदार ठाकूर यांनी याबाबत पुढाकार घेऊन ही लोकल रद्द करू देऊ नये. ही लोकल सुरू ठेवली गेली तर ती आमच्यासाठी भाऊबीज ठरेल.-अँड.मृदुला खेडेकर, महिला प्रवासी
महिला रेल्वे प्रवाशांची कैफियत ठाकूरांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 2:48 AM