तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात वारंवार बसणार्या भूकंपाच्या धक्क्या मागील कारणे शोधण्यासाठी केंद्रातील भूगर्भ तज्ञाचे पथक धुंदलवाडीत दाखल झाले आहे. इंडियन मेट्रोलॉजीकल विभाग मुंबई आणि दिल्ली मधील भूगर्भतज्ञ या पथकामध्ये समावेश आहे.तलासरी, डहाणू तालुक्यात आतापर्यंत २.७ ते ३.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे ८ वेळा धक्के बसले. शेकडो सौम्य धक्के तर शेकडोच्या संख्येने जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या परिसरात भूकंप मापन यंत्र बसविण्यासाठी दिल्ली येथून तज्ज्ञांचे पथक आले असून त्याने धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल आणि नरेशवाडी येथील के जे सोमय्या माध्यमिक विद्यालय या दोन स्थळांची पाहणी केली. त्यात कमलेश चौधरी आयएमडी दिल्ली, किरण नारखेडे आयएमडी मुंबई आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील विवेकानंद कदम हे भूगर्भातज्ञ सहभागी झाले आहेत.परिसरातील गावामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या भूकंपाचा नागरिकांनी धसका घेतला असून वारंवार बसणाऱ्या धक्क्याने अनेक घरांना तडे देखील गेलेले आहेत. गाव पाड्यातील अनेक जण भूकंपाच्या भयाने स्थलांतर करू लागले असून अनेकजण घराच्या बाहेर सुरक्षित स्थळी तंबू ठोकून त्यातच रात्र कंठत आहेत. मात्र भूकंपामागील कारणे व केंद्रबिंदूची माहिती मिळत नसल्याने प्रशासनाने परिपूर्ण माहिती मिळविण्यासाठी भूगर्भ व हवामान विभागातील पथकाला या परिसरात पाठविले आहे. भूकंप मापक यंत्र सामुग्री बसविण्यासाठी पाहणी केलेल्या स्थळांवर उद्या वरिष्ठांच्या आदेशानंतर यंत्र बसविले जाणार असून त्यानंतरच या भूकंपा मागील कारणे कळणार येणार आहे.या बाबींची आवश्यकताज्या ठिकाणी पथका मार्फत आवश्यक भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार आहे तेथे २४ तास इंटरनेट कनेक्टिव्हीटी व वीज उपलब्ध पाहिजे तसेच परिसर शांत आणि निर्मनुष्य असणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांनी सांगितले.
तलासरी, डहाणूत तज्ज्ञ उद्या भूकंप यंत्रे बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:59 PM