Virar Crime : ठाण्याचे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा विरार येथे धक्कादायक मृत्यू झाला. जमावाकडून झालेल्या हल्ल्यात मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. भांडणानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अर्नाळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिलिंद मोरे यांच्या मृत्यूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.
रविवारी संध्याकाळी विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्टजवळ ही धक्कादाय घडली. मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते. ते आपल्या कुटुंबासह रिसॉर्टमध्ये गेले होते. रिसॉर्टजवळ एका रिक्षाचा धक्का लागून झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडला. यावेळी स्थानिकांनी जमा हो हाणामारी सुरु केली. दोन स्थानिकांनी मिलिंद यांनाही मारहाण केली. त्यानंतर चक्कर आल्यानंतर मिलिंद मोरे यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन मिलिंद मोरे यांना मृत घोषित केलं. हा सगळा धक्कादायक प्रकार रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्टमधून परतताना रिसॉर्टबाहेरच एका रिक्षाचालकाने मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मिलिंद मोरे यांनी रिक्षाचालकाला थांबवले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. तितक्यात रिक्षाचालकाने गावात जाऊन स्थानिकांना बोलवून आणलं. गावातल्या स्थानिक टोळक्याने मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ तसेच दोन मित्रांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर मिलिंद मोरे एका गाडीला टेकून उभे होते. त्यानंतर अचानक ते खाली कोसळले. रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मारहाणीमुळे मोरे यांना हृदविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी फोनवर चर्चा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी दिली आहे.
दरम्यान मोरे यांचे पार्थिव सोमवारी ठाण्यात आणण्यात येणार असून जवाहरबाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.