लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: नायगाव हद्दीत वरसावे खाडी पूललगत सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करताना बुधवारी रात्री जमीन खचून वजनदार काँक्रीट ब्लॉक व माती पडल्याने पोकलेनसह चालक गाडला गेला. ४८ तास उलटून गेल्यानंतर चालकास बाहेर काढण्यात एनडीआरएफसह यंत्रणांना यश आलेले नाही. त्याला काढण्यासाठी वर पडलेले काँक्रीट ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर यंत्र आणले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कटरचे काम सुरू केले गेले नव्हते.
गुरुवारी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. याशिवाय व्हीजेटीआय, एल अँड टी कंपनी आदींची तज्ज्ञ पथके दाखल झाली आहेत. वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस अधिकारी आदीदेखील ठिय्या मांडून आहेत. जमिनीला तडे गेल्याने नवीन पुलाला तर धोका नाही ना याचीही पडताळणी करण्यात आली, परंतु पुलाला धोका नसल्याचे स्पष्ट केले गेले.
काँक्रीट ब्लॉक कोसळण्याची भीती
- बुधवार रात्रीपासून शुक्रवार रात्रीपर्यंत ४८ तास झाले, तरी मदतकार्यात काहीच प्रगती झालेली नाही. हा परिसर मूळचा वसई खाडी पात्र असून, या ठिकाणी भराव केला गेला आहे.
- त्यामुळे खालूनदेखील पाणी येत असून, माती चिखलासारखी असल्याने शाफ्टच्या तीन बाजूला असलेले अति वजनदार काँक्रीट ब्लॉक कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या ब्लॉकना रोखून धरण्यासाठी गुरुवारी लोखंडी बार लावण्यात आले आहेत.
- खाली उतरणे अतिशय धोकादायक आणि जोखमीचे आहे. वर पडलेले काँक्रीट ब्लॉक ब्रेकरने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्लॉक हे खूपच मजबूत असल्याने तोडता आले नाही.
- त्यामुळे दगड तोडणारे डायमंड कटर मागविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी एक डायमंड कटर यंत्र आणण्यात आले आहे.