नालासोपारा (मंगेश कराळे) :- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत तीन आरोपींच्या त्रिकुटाला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
फुलपाडा रोडवरील श्री अष्टविनायक गृह बिल्डिंगमध्ये राहणारे वासुदेव म्हात्रे (६४) यांच्या गळ्यातून सोन्याची चेन खेचून नेल्याची घटना २१ फेब्रुवारीला रात्री घडली होती. ते मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी फुलपाडा ते मनवेलपाडा रोडवर पायी चालत होते. त्यावेळी निदान लॅब समोरील रोडवर आरोपीने त्यांच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारले. त्यांच्या गळ्यातील १ लाख १० हजारांची २० ग्रॅमची सोन्याची चेन आरोपीने झटापटी करून बळजबरीने काढून घेऊन दुचाकीने पळून गेला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची एमओबीच्या आधारे हा गुन्हा आरोपी अज्जु ऊर्फ अजगर खान यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींचा भिवंडी परिसरात बातमीदार व तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेत असतांना, सदरचा आरोपी हा भिवंडी-वाडा रोडवरील यशवंत ढाबा येथे येणार असल्याची बातमी मिळाली. सदर ठिकाणी सापळा रचुन शिताफतीने सराईत आरोपी अज्जु ऊर्फ अजगर खान (४३), मिराज अन्सारी (३३) आणि जमाल अन्सारी (३८) यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे चौकशी केल्यावर त्याचेकडून १ लाख १० हजारांची २० ग्रॅम सोन्याचे चेन हा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. सराईत आरोपी अज्जु याचेवर ९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोणे व संतोष खेमनर यांनी केली आहे.