हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित हे शिंदेसेनेकडून, की भाजपमधून निवडणूक लढविणार, हे अजून नक्की झाले नसले तरी त्यांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांच्यासोबत शिंदेसेनेचे पदाधिकारी फिरत असले तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र फिरणे टाळल्याचे दिसून येत आहे.
पालघर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र गावित (५,८०,४७९ मते) यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव (४,९१,५९६ मते) यांचा ८८ हजार ८८३ मतांनी पराभव केला होता. पूर्वी पालघर जिल्ह्याचा उत्तर मुंबई मतदारसंघात समावेश होता. १९८९ ला राम नाईकांच्या रूपाने पालघर जिल्ह्यात भाजपचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर राम नाईक ५ वेळा, चिंतामण वनगा ३ वेळा, तर राजेंद्र गावित एक वेळा, अशा नऊ वेळा भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी स्वीकारले होते.
चार मतदारसंघांत एकाच उमेदवाराची घोषणा... पालघर लोकसभेवर सध्या शिंदेसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. या वेळच्या निवडणुकीत पालघर लोकसभेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपला दावा केला आहे. पालघरची जागा भाजप सोडायला तयार नसल्याने भाजपच्या चिन्हावर राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्याची व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे.
एक गट विरोधात, एक गट बाजूनेभाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा राजेंद्र गावितांना विरोध असला तरी भाजपमधील एक गट राजेंद्र गावितांना तिकीट देण्याच्या बाजूने आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना २०१८ च्या निवडणुकीत भाजपमध्ये आणण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुख्य भूमिका राहिल्याने गावितांना मध्येच अधांतरी सोडण्यास फडणवीस राजी नसल्याचेही कळते.