मंगेश कराळेनालासोपारा : मस्जिदमधील ट्रस्टच्या वादातून सोपारा गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुंबईच्या ललावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. याची माहिती समजल्यानंतर सोपारा गावात शोककळा पसरली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त सोपारा गावात ठेवला होता. त्यांच्यावर चॉपरने सोमवारी रात्री सुन्नी गौसिया मस्जिदजवळ जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
टाकीपाड्यात असलेल्या सुन्नी गौसिया मस्जिद ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. सोमवारी रात्री आठच्या सुमारास रौफ अब्दुला शेख, बांधकाम व्यावसायिक मुस्सवीर मोहम्मद डायर उर्फ मुच्छु, सिध्दीक पुंजाणी, रफीक मन्सुरी हे या मशीदीत नमाज पठणासाठी गेले होते. नमाज पठण करून बाहेर आल्यावर मोहम्मद इम्तियाज इस्माईल खान (३६), इम्रान युसूफ शेख (३३), अबरार खान (३८), अतारु खान (२८), इर्शाद खान उर्फ बंटी (४०) यांनी रौफ अब्दुला शेख आणि मुस्सवीर डायर यांच्याशी वाद घातला होता. तुम्ही या मशीदीत यायचे नाही अशी दरडावणी यावेळी खान बंधूंनी केली होती. त्यावर शेख आणि डायर यांनी जाब विचारल्यावर संतप्त झालेल्या इरशाद खानने आपल्या जवळ बाळगलेल्या चॉपरने मुस्सवीर मोहम्मद डायर उर्फ मुच्छू यांच्यावर वार केला होता. शुक्रवारी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर परिवाराच्या ताब्यात त्यांचा मृतदेह देण्यात आला आहे.
मस्जिदमधील ट्रस्टीवरून वाद झाला होता. आरोपींनी त्यांच्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली होती. आता आरोपींवर हत्येचे कलम लावण्यात येईल. पाचही आरोपी अगोदरच ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे.विलास सुपे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)