मीरा रोड : बनावट कागदपत्रांच्या आधारे नागालँड, अरुणाचल प्रदेश येथे अस्तित्वात नसलेल्या वाहनांची नोंदणी करायची व नंतर त्यानुसार वाहने चोरून त्याची महाराष्ट्रात पुन्हा नोंदणी करून विकणाऱ्या चौघांना मीरा भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून ७ कोटी ३२ लाखांची एकूण ४७ वाहने जप्त केली असून राज्यासह राजस्थान, उत्तर प्रदेश येथील वाहनचोरीचे १६ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सोमवारी दिली.
फेब्रुवारी २०२१ मध्ये काशिमीरा भागातून ट्रक चोरीचा गुन्हा तर जुलै २०२१ मध्ये वालीव पोलिस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने तपास करत गुन्ह्याची उकल केली.
४७ वाहने जप्त याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गॅरेज चालवणारा अजहर शेख (३५, रा. धारखेड) व समीर नसीर खान (४१, रा. खंडाळा, ता. वैजापूर); अमरावतीच्या वलगाव रोड येथील गाडी खरेदी विक्री करणारा मोहम्मद शकील शाह (४८) व नांदेडचा शेख नशीर शहजादमिया (४३) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तपासात आरोपींकडून पोलिसांनी १४ टाटा ट्रक, १० हायवा टिपर, ८ आयशर टेम्पो, ९ अशोक लेलँड ट्रक व टेम्पो व प्रत्येकी १ मारुती आर्टिगा, वॅगनार, स्विफ्ट डिझायर, इनोव्हा, क्रुझर, महिन्द्रा जितो अशा चोरलेल्या ४७ गाड्या हस्तगत केल्या. ७ कोटी ३२ लाख ४१ हजार अशी एकूण किंमत या गाड्यांची आहे.