लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या मोरवा, राई - मुर्धा दरम्यानच्या ३२ हेक्टर जागेवर मेट्रो कारशेडचे आरक्षण प्रस्तावित केल्या प्रकरणी आलेल्या हरकती - सूचनांवर सुनावणी हि कोकण भवन ऐवजी भाईंदर मध्ये होणार आहे . ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी सुनावणी चालणार आहे .
मीरा भाईंदर साठीच्या मेट्रो ९ तसेच मेट्रो ७ अ मार्गाच्या कारशेड साठी मोरवा, राई व मुर्धा दरम्यानच्या ३२ हेक्टर मोकळ्या खाजगी जमिनीवर शासनाच्या नगरविकास विभागाने आरक्षण टाकले आहे . शासनाने मेट्रो कारडेपो साठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार तशी सूचना सप्टेंबर २०२२ मध्ये प्रसिध्द केलेली आहे.
वास्तविक ह्या ठिकाणी मेट्रो कारशेडला ह्या भागातील एका संघटने मार्फत विरोध करण्यात आला आहे . तशी निवेदने देण्यात आली आहेत . आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मेट्रो कारशेड विरोधात भूमिका घेत सदर कारशेड उत्तन भागातील सरकारी जमिनीवर उभारण्याची मागणी चालवली आहे .
दरम्यान सदर जमीन मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्या बाबत शासनाने सूचना प्रसिद्ध केल्या नंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या . विहीत मुदतीत १ हजार १७६ हरकती वा सुचना दाखल झालेल्या आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार हरकती वा सूचना देणाऱ्यांना सुनावणी देणे आवश्यक आहे .
मोरवा , राई व मुर्धा गावातून मोठ्या प्रमाणात हरकती असल्याने त्याची सुनावणी नवी मुंबईच्या कोकण भवन येथे ठेवल्यास नागरिकांना येण्या जाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार होता . या बाबत आ . सरनाईक यांनी दूरध्वनी द्वारे नगररचना कोकण विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याशी संपर्क साधून सुनावणी भाईंदर मध्येच घेण्याची मागणी केली होती .
त्या अनुषंगाने आता मेट्रो कारशेडची सुनावणी हि कोकण भवन येथे न ठेवता मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहात ठेवण्यात आली आहे . ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी हि सुनावणी होणार आहे . सुनावणीसाठी पालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता आहे .