(मंगेश कराळे)
नालासोपारा: ओडीसा राज्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असणाऱ्या आरोपीला पकडण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. आरोपी संतोष सेठी (२२) याला शुक्रवारी पकडून कोडाला पोलीस पथकाच्या ताब्यात तपास व चौकशीसाठी देण्यात आले आहे.
ओडीसा राज्याच्या गंजगम जिल्ह्यातील कोडाला पोलीस ठाण्याचे हद्दीत एका अल्पवयीन मुलीची हत्या करून आरोपी तीन महिन्यांपासुन फरार झालेला असुन तो पालघर जिल्ह्यातील वसईच्या पुर्व परिसरातील कोठेतरी कंपनीत काम करत आहे. वसई परिसरात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने आरोपीत हा नेमका कोणत्या कंपनीत काम करत असावा याबाबत काही एक माहिती नव्हती. आरोपीत याने गुन्हा केल्यापासुन फोन वापरणे बंद केले होते अशा स्वरुपाची माहिती देवून माहीती आलेल्या तपास टीमने वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना देऊन मदतीची मागणी केली.
त्यानुसार सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पथकासोबत वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वसई औदयोगिक परिसरात जावुन आरोपीत याचे गावाकडील कोण-कोण लोक वसई परिसरात कंपनीत काम करतात याबाबत शोध घेत होते. त्यावेळी आरोपीत हा सातीवली परिसरातील लक्ष्मी इंड्रीस्ट्रीयल या कंपनीत काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. लक्ष्मी इंड्रीस्ट्रीयल परिसरात त्याचा शोध घेतला असता तो कामावरुन घरी गेला आहे. ही माहिती मिळाल्याने आरोपीत याचे राहते पत्त्याचा शोध घेत आरोपीत राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.