मंगेश कराळे
नालासोपारा :- यूएई व अमेरीरेकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या चार बांग्लादेशी आरोपींना नायगाव येथून ९ ऑक्टोबरला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वसई न्यायालयाने सुनावली आहे. या आरोपीकडून विरार येथील ६४ वर्षाच्या वयोवृध्दाचा गुन्हा उकल करण्यात यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
दहिसर येथे राहणारे वालजीभाई वीरजीभाई काटेलिया (६४) यांना शंभर रुपयांच्या सुट्ट्या नोटांची गरज होती. ओळखीच्या पीओपीचा व्यवसाय असलेल्या रफिक, अजीजुल डोबी शेख व रफिकची मावशी अशा तिघांनी त्यांना सुट्टे १०० रुपयांच्या नोटा देतो असे आमिष दाखवले होते. सकाळी दहाच्या सुमारास विरारच्या दत्त मंदिरासमोर तिन्ही आरोपींनी पाचशेच्या नोटा असलेली आठ नोटांची बंडले असा ४ लाख रुपये वालजीबभाई यांच्याकडून घेतल्यानंतर त्यांना १०० रुपयांच्या नोटांची बंडले रुमालात बांधून देऊन ते पळून गेले होते. वालजीमाई यांना नोटांच्या बंडले ही खरी नसुन ती कागदाची असल्याचे समजताच फसवणूक झाल्यामूळे त्यांनी विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी गुन्हयाचा तपास करत तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून आरोपी अख्तर रज्जाक चौधरी (५५), सागर रहीम हलदर (४५), तहुरन गुलामरसुल शेख (५२) आणि फातीमा बेगम मुशर्रफ शेख (२७) यांना ९ ऑक्टोबरला ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन रोख रक्कम, संयुक्त अरब अमिरातचे (परकीय चलन), मोबाईल फोन असा १ लाख ४१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हे मुळचे बांगलादेशी नागरीक असुन ते बेकायदेशीरीत्या भारतामध्ये वास्तव्य करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हे प्रथम फिर्यादी यांच्याशी ओळख करुन त्यांच्याकडे संयुक्त अरब अमिरात आणि अमेरीकेचे चलन (डॉलर) असल्याचे सांगून ते भारतीय रुपयांच्या बदल्यात कमी किमतीमध्ये देण्याचे अमिष दाखवुन त्यांच्याकडून त्यामोबदल्यात पैसे घेवुन हातचलाखीने हातरुमालात गुंडाळलेली रद्दी पेपर देवुन फसवणुक करतात.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे, मयुरी अनारसे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.