मंगेश कराळे -
नालासोपारा - हत्येच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी यूपीतून अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
कांदिवलीच्या मारुती चाळीत राहणारा सुधीर सिंग (२७) आणि वालईपाडा रोडवरील उपाध्याय चाळीत राहणारा वैभव मिश्रा (२८) हे दोघे १२ जानेवारीला गौराईपाडा परिसरात रूम बघण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी त्याचे अपहरण करून गौराईपाडा परिसरातील यादवेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपींनी अंगावर कोयता, दुसरे धारदार हत्याराने वार करून लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले होते.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपी सूरज चव्हाण (२५), साहिल विश्वकर्मा (२१) आणि अखिलेश सिंग (२७) या तिन्ही आरोपींना १२ जानेवारीला पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर परिसरातून पळून जात असताना पाठलाग करून शिताफीने पकडले होते. पण सदर गुन्हा घडल्यापासुन या गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल पाल ऊर्फ मर्दा हा फरार झाला होता.
गुन्हयातील मुख्य आरोपी राहुलचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी आदेश दिले होते. सदर आदेशान्वये पेल्हारचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी फरार आरोपी याच्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली. आरोपी हा राज्य उत्तर प्रदेश येथे असण्याची शक्यता असल्याने पेल्हार पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी भदोई येथे गेले.
भदोई जिल्ह्यातील चौरीबाजार या ठिकाणी आरोपीबाबत अधिकची माहिती प्राप्त करुन तो रामपूर येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ रामपूर येथील पोलीसांच्या मदतीने आरोपीचा साकरी या गावात रात्रौवेळेस शोध घेत असताना त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने तो जंगलात पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यांना अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी तुकाराम भोपळे, पोहवा योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अविनाश देसाई, फिरोज तडवी, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन भोईर, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी पार पाडली आहे.