- मंगेश कराळे
नालासोपारा :- नाळा गावातील एका बंद घरात चोरीसाठी घुसलेल्या चोरट्यांना नागरीकांनी पकडून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. संतप्त जमावाने चोरट्यांच्या रिक्षांची ही तोडफोड केली असुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नालासोपारा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाळा गावातील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिराजवळ रानेभाट रोड येथे मुख्य रस्त्यावर ग्रॅब्रीयल कोरीया यांचा बंगला आहे. ग्रॅब्रीयल कोरीया हे बोरीवलीत राहात असल्यामुळे त्यांचा बंगला सद्या बंद आहे. चोरट्यांनी या बंद घराची रेकी करुन दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील दोन सिलींडर, इन्वर्टर व बॅटरी, एसी युनीट व मुलांच्या पिगी बॅगेतील पैसे असा मुद्देमाल चोरून नेला होता. याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात ग्रॅब्रीयल कोरीया यांनी दिली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास पुन्हा पाच चोरट्यांनी बंगल्यातील इतर सामान चोरण्यासाठी ते रिक्षा घेऊन आले होते.
तीन चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरील इन्वर्टर व बॅटरी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला असता परीसरातील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यातील दोन चोरट्यांना पकडण्यात नागरीकांना यश आले तर उर्वरीत तीन जण पळून गेले. संतप्त नागरीकांनी त्यानंतर पकडलेल्या चोरट्यांपैकी एकाची यथेच्छ धुलाई केली. यात दुसरा पकडण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असुन चोरी करणारे सर्वजण नालासोपारा टाकी रोड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
संतप्त जमावाने त्यानंतर चोरट्यांनी आणलेल्या रिक्षाचीही तोडफोड केली. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी आरोपीला नेण्यासाठी खाजगी वाहन आणले असल्यामुळे नागरीकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. अखेर नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे यांनी अधिक पोलीस बळ सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व परिस्थीतीवर वेळीच नियंत्रण मिळवले. याबाबत नालासोपारा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी व कारवाई करत आहे.