नालासोपारा (मंगेश कराळे) :- खदानीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी उलगडले आहे. पेल्हार पोलिसांनी दाखल अकस्मात मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून मित्रानेच पैशाचा तगादा लावला आणि रात्रभर कोंडून ठेवल्याच्या रागातून हत्या केल्याचे तपासात उघड करून आरोपीला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
धानिव पांढरीपाडा परिसरातील गुंजाळकर यांच्या खोल दगडाच्या खदानीत १७ जानेवारीला दुपारी एक मृतदेह सापडला होता. आरबाज राईन (२१) याच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी १८ जानेवारीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या चौकशीत जाबर पाड्यातील ब्रिजेश चौरसिया (४१) याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांची बहीण सारिका चौरसिया यांनी भावाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील यांना योग्य त्या सूचना देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी सारिका आणि साक्षीदाराच्या केलेल्या चौकशीत ब्रिजेश व त्याचा मित्र बलराम यादव हे दोघे गुन्हा घडेपर्यंत एकत्र सोबत असल्याचे आणि खदानीमध्ये ब्रिजेशला धक्का मारून बलरामला पळून जात असताना सांगितले. बलराम उर्फ बलीराम (२७) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. बलरामने ब्रिजेशकडून ५५ हजार रुपये घेतले होते. यापैकी २२ हजार रुपये परत देऊन देखील ब्रिजेशने त्याला १६ जानेवारीला संध्याकाळी जाबरपाडा येथील राहत्या दुकानात बोलावले. त्याच्याकडून १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर ३ लाख रुपये घेतल्याचे लिहून घेतले. त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवून शिविगाळ व दमदाटी करत पैसे मागितले. पैश्याचा तगादा लावत असल्याचा आणि रात्रभर कोंडून ठेवल्याचा राग मनात धरून जीव घेण्याच्या उद्देशाने खदानीत ढकलून देऊन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून गुरुवारी अटक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन मोहिते, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.