मीरारोड : मीरा भाईंदर महानगरपालिका शाळां मध्ये दिवाळी नंतर डिजिटल वर्ग सुरू करण्यात आल्या मुळे ७७७ विद्यार्थी वाढले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आदी माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. महापालिका शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या बैठका व शाळांना भेटी देणे. शिक्षकांना प्रशिक्षण, शाळेतील वर्गात रंगरंगोटी, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, संगणक कक्ष आदी उपाययोजना प्रशासनाने चालवल्या आहेत .
दिवाळी सुट्टी नंतर महानगरपालिकेतील शाळांमध्ये डिजिटल स्वरूपात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती ही चित्रफित किंवा फोटोच्या स्वरूपात शिकवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात आले आहेत.
या डिजिटल वर्गांमुळे महानगरपालिका शाळां मधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल वर्ग सुरू करण्यापूर्वी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ७ हजार २४८ इतकी होती. डिजिटल वर्ग सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांची पटसंख्या ८ हजार २५ इतकी झाली आहे. डिजिटल वर्ग सुरु झाल्या पासून ७७७ विद्यार्थी वाढले आहेत. शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश करावे असे आवाहन आयुक्त ढोले यांच्या वतीने करण्यात आले आहे .