पालघर/ विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील सजन गावच्या हद्दीत धरणामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी पुरावा सोडला नसताना विक्रमगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मृताचा मोठा भाऊ आकाश वसंत लोहार (वय २८) याला हत्याप्रकरणी अटक करण्यात यश मिळविले.
आरोपी आकाश लोहार (मूळ रा. वारलीपाडा, ता. विक्रमगड) हा व्यवसायानिमित्त वसई तालुक्यात राहतो. त्याचा लहान भाऊ शिवम लोहार (वय १९) याला दारूचे व्यसन होते. काम आणि दारू पिण्यासाठी पैसे मिळत नसल्याने तो चोऱ्या करीत होता. पैसे न मिळाल्यास तो आई-वडिलांसह सर्वांना मारहाण करीत होता. याला कंटाळून त्याचा मोठा भाऊ आकाशने १ सप्टेंबरला शिवमला रिक्षात बसवून दारू पाजली. त्याला सोबत घेऊन तो सजनपाडा येथील धरणावर गेला. तेथे त्याला दारू पाजून मद्यधुंद अवस्थेत पडलेला असताना नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर मोठे दगड त्याने भावाच्या शरीराभोवती दोरीने बांधून त्याला धरणाच्या पाण्यात ढकलून दिले.
पुरावे नष्ट केले
मृताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने त्याच्या अंगावरील कपडे आणि हातातल्या वस्तूही काढून टाकल्या.
काही दिवसांनंतर धरणाच्या पाण्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती विक्रमगड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.
उडवाउडवीची उत्तरे
जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांनी सपोनि रवींद्र पारखेसह स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी तपास सुरू केल्यावर सजनगावच्या रस्त्यावर एक रिक्षा धरणाकडे जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले.
रिक्षाच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर कुटुंबाला त्रास होत असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.