हितेन नाईक/हुसेन मेमनपालघर/जव्हार:- जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कुंडाचा पाडा ह्या शाळेतील केंद्र प्रमुखांच्या बदलीचा कार्यक्रमासाठी मुख्याध्यापकांनी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवले. तर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी परिसरातील अनेक शाळांनी ही विद्यार्थ्यांना घरी सोडीत ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे आणि सदस्य प्रकाश निकम ह्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून त्याच्या उज्ज्वल भविष्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा केळघर, राजून पाडा,सुळ्याचा पाडा,धारण पाडा,सुतार पाडा,नेहाळी खुर्द,तळ्याचा पाडा, नंदन माळ, करोळ पाडा,शिव कोरड्याची मेढ आदी शाळेतील शिक्षक ह्या केद्रप्रमुखांच्या बदलीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यामुळे ह्या कार्यक्रमाला आमचा विरोध नसल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळणाऱ्या सर्व शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कट केला जाईल असे ह्यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य प्रकाश निकम ह्यांनी जव्हार,मोखाडा आदी ग्रामीण भागातील शिक्षक शाळेत वेळेवर उपस्थित नसणे,विद्यार्थी गैरहजर असले तरी त्याची हजेरी लावणे असे प्रकार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याची गंभीर बाब सभे समोर आणली होती. शनिवारी गलेलठ्ठ पगारावर डोळे ठेऊन देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त करणाऱ्या ह्या शाळेतील शिक्षकांचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे आणि सदस्य प्रकाश निकम ह्यांनी सरळ जव्हार च्या कुंडाचा पाडा शाळेला भेट दिल्यावर हा अश्लाघ्य प्रकार निदर्शनास आला. ह्यावेळी उपस्थित शिक्षकांची एकच तारांबळ उडाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्याशी खेळणाऱ्या सर्व शिक्षकावर कडक कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.