वसई/नालासोपारा : वालीव पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर त्याच पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुद्देमाल कारकून सहा. फौजदार शरीफ शेख असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी जप्त केलेल्या दोन कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट त्याने परस्पर विकून टाकल्या. दरम्यान, वसई न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक विनायक माने आणि त्यांच्या टीमने ३ करोड २४ लाख रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट डिसेंबर २०१८ मध्ये जप्त केल्या होत्या. हा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत मुद्देमाल टेम्पोसह जप्त केला होता. टेम्पोे मिळावा म्हणून टेम्पो मालकाने वसई न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी करून टेम्पोे परत देण्याचे आदेश वालीव पोलिसांना दिल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा या टेम्पोमध्ये विदेशी सिगारेटच्या १५० गोण्या होत्या. पण टेम्पो परत देताना ५० गोण्याच आढळून आल्या. सिगारेटच्या २ करोड १६ लाख रु पयांच्या १०० गोण्या आढळून न आल्याने खळबळ माजली.पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी बुधवारी गुन्हा दाखल करून मुद्देमाल कारकून सहा. फौजदार शरीफ रमजान शेख याला अटक केली. या चोरी प्रकरणामध्ये याचे कोणी साथीदार आहेत का? वालीव पोलीस ठाण्यातील कोणी अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी आहे का, याचा शोध सुरू असून वसईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील अधिक तपास करत आहेत. चोरीचा माल पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याने हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसाकडूनच पोलीस ठाण्यात चोरी, दोन कोटींच्या सिगारेटची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:52 PM