ठाणे : येथील जिल्हा शासकीय (सामान्य) रुग्णालयात वाढत्या चो-यांच्या प्रकारानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पुन्हा एकदा ५० सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. अवघ्या दोन सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने रुग्णालयाच्या आवारात गर्दुल्ले आणि मद्यपींचे प्रमाण वाढले आहे. त्यातच चोरीचे प्रकार वाढल्याने वर्षभरात दुसºयांदा सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणी पुन्हा एकदा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी सुरुवातीपासूनच अवघे चार सुरक्षारक्षक होते. त्यातील दोन सुरक्षारक्षक निवृत्त झाले असून सद्य:स्थितीत दोनच सुरक्षारक्षक रुग्णालयात तैनात आहेत. ते सुरक्षारक्षक दोन शिफटमध्ये काम करत असून महिला प्रसूती वॉर्ड येथेच तैनात असतात. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटपासून रुग्णालयाचा परिसर सुरक्षारक्षकांविना दिसतो. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात गर्दुल्ले आणि मद्यपींचे प्रमाण वाढले आहेत. त्यातच बाह्यरुग्ण विभागाच्या काउंटरवरून ४१ हजार ७५५ रु पयांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्या वेळी, चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा फिरवून ठेवल्याचेही पुढे आले आहे. तत्पूर्वी रुग्णालयातील विविध विभागांत चोरीच्या घटना घडल्या आहेत. शल्यचिकित्सक इमारतीच्या तळ मजल्यावर झालेल्या बॅगचोरीच्या घटनेतील चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. मात्र, तो पकडला न गेल्याने चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. यातच या वर्षातील एप्रिल महिन्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णासह त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरला मारहाण केली होती. त्या वेळी रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या वेळी रुग्णालय प्रशासनाने ५० सुरक्षारक्षकांची गरज असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत, सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणीही केली होती. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यातच, या वाढत्या चोरीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा ५० सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चोरीचे प्रकार वाढले , जिल्हा शासकीय रुग्णालयाला सुरक्षारक्षक मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:27 AM