नालासोपारा : कॉलेजला दांडी मारून सोसायटीच्या परिसरात ठाण मांडून बसणाºया प्रेमीयुगुलांना हाकलण्यासाठी नालासोपारातील मथुरानगरातील रहिवाशांनी अनोखी शक्कल लढवली आहे. सोसायटी परिसरात ‘टाइमपास’ करणाºया प्रेमीयुगुलांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये देण्याची ताकीद देणारे जाहीर फलकच या नागरिकांनी झळकवून प्रेमीयुगुलांना इशारा दिला आहे.
नालासोपारा पुर्वेकडील तुळींज मथुरानगर परिसरात विवा ज्युनिअर कॉलेज आहे. या कॉलेजमधील मुले-मुली दांडी मारून मथुरानगर परिसरात ठाण मांडून बसतात. सेल्फी काढणे, मोबाइल गेम खेळणे, अचरट-विचरट विनोद करणे, आरडा-ओरडा करणे असे प्रकार त्यांच्याकडून होतात. भर रस्त्यात केल्या जाणाºया या प्रकारांमुळे जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना खूप त्रास होत होता. जुनिअर कॉलेजच्या इमारतीत केएमपीडी शाळा आहे. या शाळेत मुलांना सोडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिला जात असतात. त्यांना या विद्यार्थ्यांच्या थट्टा-मस्करीचा त्रास सहन करावा लागतो. ही मुले रस्त्यातच धावपळ आणि हाणामाºयाही करीत असल्यामुळे त्यांचा धक्का लागून लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना अपाय होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा घटनाही वरचेवर घडत असल्याचे सांगण्यात येते. तसेच काही प्रेमीयुगुले अश्लील चाळेही करीत असल्यामुळे शाळेत जाणाºया महिला आणि मुलींवर खजील होण्याची वेळ येत असते. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी मथुरानगर रहिवासी कल्याणकारी संस्थेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. मथुरानगर परिसरात उभ्या राहणाºया, थांबणाºया प्रेमीयुगुलांचे फोटो काढले जातील. तसेच ते पोलिसांनी देऊन कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद देणारा फलक या संस्थेने लावला आहे. या फलकाची धास्ती घेऊन आता प्रेमीयुगुलांनी या परिसरात फिरण्याचे टाळले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.