हितेन नाईक पालघर : हा जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांना पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर या केंद्राद्वारे भर देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सेविका आणि आशा कार्यकर्तींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथे करण्यात आले होते. त्यासाठी जि. प. महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकरी (साप्रवी) प्रकाश देवऋषी, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे संपूर्ण जिल्हातून आलेल्या मुख्यसेविका, आशा ताई व संबंधित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंड घेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणार्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या केंद्रामधील बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार, तीन वेळा अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहार असा एकूण आठ वेळा आहार दिला जाणार आहे.>सेविकांना घ्यावी लागेल ही प्रतिज्ञामी एक अंगणवाडी सेविका अशी प्रतिज्ञा करते की, जी ग्राम बालविकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरु झाली आहेत. त्यात सॅम आणि मॅम ने प्रभावित असलेल्या बालकांसाठी २ हजार १५० रु पये प्राप्त झाले आहेत. मी सर्वांच्या साक्षीने मासिक सभेमध्ये शपथ घेते की, मला माझ्या बालविकास केंद्रासाठी मिळालेल्या एकूण रकमेचा मी बालकांच्या आहार व औषधांसाठी १०० टक्के विनियोग करीन आणि अशी बालके सुदृढ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून माझी अंगणवाडी कुपोषणमुक्त करेलच, असे मी आपणास आश्वासित करते. अशी प्रतिज्ञा सेविकांना घ्यावी लागणार आहे. या २८५ ग्राम बाल विकास केंद्रांपैकी डहाणू तालुक्यात ८५ , वसई तालुक्यात ९, वाडा तालुक्यात ३८ ्र, पालघर तालुक्यात १८ , जव्हार तालुक्यात ५५, विक्रमगड तालुक्यात ४३, मोखाडा तालुक्यात २६ तर तलासरी तालुक्यातील ११ केंद्रांचा समावेश आहे. आता ती कधी सुरु होतात व त्यांची फलनिष्पत्ती कशी असेल याकडे लक्ष लागले आहे.
पालघर जिल्ह्यात २८५ बालविकास केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:53 AM