शशी करपेवसई : जिल्हा परिषदेच्या शाळांतील बँकेत खाते नसलेले सुमारे नऊ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. आधार कार्ड नसल्याने विद्यार्थी बँक खाते उघडू शकत नाहीत. त्यामुळे गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात भरण्याचे राज्य सरकारचे धोरण वसईत अपयशी ठरले आहे.शैक्षणिक साहित्य वाटपात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पुरेशी कागदपत्रे आणि आधार कार्ड नसल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थी बँकेत खाते उघडू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना गणवेशाचे पैसे मिळू शकलेले नाहीत.गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे शू्न्य बॅलन्स खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्याची अट राज्य सरकारने घातली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या अगदीच गरीब घरातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांकडे बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्डासारखी पुरेशी कागदपत्रे नाहीत. तर आधार कार्ड बँक खाते उघडण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वसई विरार परिसरात आधार कार्ड काढून देणारी सेवाच उपलब्ध नाही. आधार कार्ड काढून देणारी काही खाजगी तुरळक केंद्रे आहेत. पण, त्यांच्याकडून लूटमार सुरु असल्याने गरीब आधार कार्ड काढू शकलेले नाहीत. त्यांना खाते उघडता आले नाही. पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने बँक खाती उघडली न गेल्याने सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांचे पैसे शिक्षण विभागाकडे पडून राहिले आहेत.>जुन्या खात्यात पैसे जमा होणार ?वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०३ शाळांत ५ हजार ३१५ मुले आणि १४ हजार ५५८ मुली आहेत. यातील नऊ हजार विद्यार्थी बँक खाते उघडू शकलेले नाहीत. त्यांचे पालक जुन्या बँक खात्यावरच गणवेशाचे पैसे जमा व्हावेत यासाठी शासनाकडे प्रयत्न सुुरु असे गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले.
गणवेशांपासून ९ हजार वंचित, आधार कार्ड नसल्याने बँक खाती नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 3:28 AM