- वसंत भोईरवाडा - मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आग लागत असून त्या विझविण्यात होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयंचे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत तरीही अग्निशमन केंद्र नाही.वाडा तालुका डी प्लस झोन जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून यात अनेक रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षाांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगरते येथील जे.आय.के. या रासायनिक कंपनीत रिअॅटरचा स्फोट होऊन कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील स्वामीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून गिरणी खाक झाली. त्यात २० लाखांहून अधिक नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या एका कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सापरोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पराग केमिकल या कंपनीचे ६० लाखांचे नुकसान झाले होते.कोडले येथील फायबर लोन प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटींचे नुकसान झाले. मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखाचे नुकसान झाले होते. वाडा आगाराची एक बस पेटून आणि दोन गाड्यांना त्याची झळ लागून २० लाखांची हानी झाली होती. अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशामक केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.भिवंडी येथूून येतात बंबकोणत्याही कारखान्याला आग लागल्यास अथवा स्फोट झाल्यास आग विझवण्यासाठी ४० कि.मी. लांब असलेल्या असलेल्या भिवंडी अग्निशमन केंद्राचे बंब मागवावे लागतात. त्यांना काही कारणामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर होतो. वाडा आणि शेजारच्या विक्रमगड या तालुक्यात आपत्कालीन काळात जीवित तसेच वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाची आवश्यकता असल्याचे घोणसई येथील जेराई फिटनेस कंपनीचे व्यवस्थापक दिलीप लाड यांचे म्हणणे आहे.मी वाड्यात नवीन आहे. त्यामुळे याविषयी योग्य ती माहिती घेतो. मात्र, हा महत्त्वाचा विषय असल्याने यासंदर्भात तातडीने काहीनाकाही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाशी बोलून वरिष्ठ पातळीवर व्यवहार करू.- डॉ. उद्धव कदम,तहसीलदार, वाडा
वाड्यात कारखाने हजार पण अग्निशमन दल नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:30 AM