- मंगेश कराळे
नालासोपारा : माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. कर नाही तर डर कशाला म्हणून मी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना कोणालाही घाबरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात बविआकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला बोलताना दिले आहे.
पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आग्रह असून त्यानुसार बैठका, मेळावे सुरू आहेत. जर बविआने उमेदवार उभा केला तर १०० टक्के निवडून येणार असा दावाही त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील ६ आमदारांपैकी तीन आमदार बविआचे आहेत. जिल्हा परिषदेत तीन सभापती, वसई विरार मनपा, अनेक ग्रामपंचायतीत सर्वात मोठा पक्ष बविआ असून पालघर लोकसभा मतदारसंघावर नॅचरली बविआचा हक्क असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे आम्ही विचार करत असून आमची फिक्स मते आहेत. आमच्या पक्षाचा फक्त उमेदवाराचे नाव घोषित करायचे आहे इतकेच बाकी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. १२ महिने लोकांची कामे कोण करतो, कोण उपलब्ध असतो याचा विचार लोक नक्की करतात म्हणून लोकांची चिंता वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.