- आशिष राणेवसई - वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा खालावला असून जेमेतेम महिनाभर पुरेल इतकाच साठा या धरणात शिल्लक आहे. मात्र पालघरमधील सूर्या-धामणी धरणातील साठा हा मुबलक असल्याने तो बहुतांशी सहा ते आठ महिने पुरेल. याउलट उसगाव व पेल्हारमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र वसई विरार शहरात पातळी कमी होऊनदेखील पाणीकपात केली जाणार नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला दिली आहे.वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा -३ मधून १०० एमएलडी तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता जून संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावली असून हवी तशी दणकेबाज वृष्टी केलेली नाही.त्यामुळे गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला आहे. या तीन धरणांपैकी जिल्ह्यातील पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६.३५ घनमीटर दशलक्ष लिटर (५२.१५ दशलक्ष ) म्हणजेच १८.८४ टक्के तर वसई तालुक्यातील उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष (०.६१८ दशलक्ष), १२.४६ टक्के आणि पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर, (०.२८६ दशलक्ष ) म्हणजेच ८.०३ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. पावसाने जून संपला तरी अद्याप केवळ तोंडच दाखवले आहे, मात्र वसई विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहणार हे तर नक्की आहे.त्यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले असले तरीही याकरिता वसई विरार महापालिकेला धरणात असलेल्या या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. म्हणजेच सूर्याच्या दोन्ही योजनांतून २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण २५० दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून २० तर पेल्हारमधून १० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. या दोन्ही धरणांतील पाणीसाठा फक्त महिनाभर पुरेल इतकाच आहे असे त्यांनी सांगितले.पाणीपुरवठा विभागाचे आवाहनतसेच वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या महिनाभर भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनीदेखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.‘वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया वसई तालुक्यातील दोन धरणामधील पाण्याची पातळी खालावली असून जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तरी मात्र पालघर जिल्ह्यातील सूर्या- धामणी धरणात अजूनही सहा ते आठ महिने पुरेल इतका म्हणजेच १८.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.’नियोजन व गळतीबाबत पथक फिरते करा-नागरिकवसई-विरार शहर महापालिकेने धरणातील पाण्याची पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, तसे प्रयत्न न केल्यास हजारो लिटर पाणी वाया जाईल व धरणातील साठा पाहता पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता अधिक होईल, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत, तर याबाबत महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे.
वसई-विरारमध्ये तूर्तास पाणीकपात नाही, धामणी धरणात १८.८४ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:40 AM