वसई : वसई तालुक्यात रेशनिंग मालाची ने-आण व चढ-उतर करणाऱ्या हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यातील जनता रेशनिंगला मुकणार असून त्याचा फटका अंत्योदय कार्डधारकांना बसणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कार्डधारकांनी लोकमतला सांगितले.वसई तालुक्यात ग्रामीण परिसरात आदिवासी, गरीब नागरिकांचे वास्तव्य आहे. पावसाळयामध्ये हाताला काम कमी असल्यामुळे शासनाकडून येणाऱ्या रेशनिंग धान्यावरच त्यांची चूल पेटते. या भागातील वीट उत्पादन, रेती हे व्यवसाय बंद पडत आहेत. तर वाढत्या खर्चामुळे छोट्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे येथील भूमीपुत्रांना रोजगार मिळेनासा झाला आहे. या वर्षी पावसाने सुरूवातीला दडी मारल्याने त्यांनी लावलेला भाजीपालाही वाया गेला आहे. त्यामुळे आता या भागातील गरीब जनतेला आधार होता तो रेशनिंगचा पण, जुलैचे रेशनिंग न आल्याने अच्छे दिन हेच का ? असा सवाल गरीब जनता विचारीत आहे. वसई तालुक्यात अन्नधान्याचा काळाबाजार होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. तसेच दोन महिन्यांतून येणारे रेशनिंग एकच महिन्याचे मिळत असल्याने एका महिन्याचे जाते कुठे? हा ही शासनाला विचार करायला लागणारा प्रश्न आहे. शासनानेही लवकरच हा संप मिटवून रेशनिंगचे वितरण करून दिलासा द्यावा, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)
हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यात जुलैचे रेशनिंग नाही
By admin | Published: July 30, 2015 10:50 PM