जव्हार : जव्हारपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या (काळशेती) नदीवरील काळमांडवी धबधबा अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी खोल दरी आहे. याच धबधब्यात बुडून पाच तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली होती. या धबधबाच्या पर्यटन स्थळी सुरक्षाच नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. या धबधब्याच्या डोहात पडल्यानंतर चोहोबाजूंनी खडकाळ आणि संपूर्ण उताराचा भाग असल्याने त्या दुर्दैवी पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.जव्हार शहर १ जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने, धबधब्यावर जाण्यास बंदी असतानाही हे तरुण आले कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गेल्या आठवडाभरापासून काळमांडवी धबधबा पर्यटनस्थळी येऊन काही तरुण पार्टी करत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.पाच वर्षापूर्वी गुजरात येथील२ तरुण आणि एक तरुणी असा तिघांचा दाबोसा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पावसाळ्यात जव्हार तालुक्यातील धबधब्यांवर दरवर्षी अशा अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.काळमांडवी धबधबा हा आपटाळे ग्रामपंचायत हद्दीत येतो. मात्र हा धबधबा धोक्कादायक आहे, असे ग्रामपंचायतीने कुठेही बोर्ड लावलेले नव्हते. बोर्ड लावून काळमांडवी धबधब्याचा डोह किती खोल आहे, यांचीही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजेच पर्यटकांनी सावधगिरी बाळगली असती, अशा दुर्दैवी घटना घडल्या नसत्या, असेही बोलले जात आहे.पर्यटनस्थळांवरबंदी : जव्हार शहरातील काळमांडवी धबधबा, दाबोसा धबधबा, भोपतगड, दादरकोपरा धबधबा, सनसेट पॉइंट, हनुमान पॉइंट, राजवाडा, विजय पॅलेस या पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही लपूनछपून हे पर्यटक येतात तरी कसे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बंदी असतानाही त्या पर्यटन ठिकाणी जेवण, दारू पार्सल नेऊन पार्ट्या केल्या जात आहेत. याकडे आता तरी या पाच तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर अन्य पर्यटक धडा घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
जव्हारचा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा ‘काळ’ , पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्थाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 1:48 AM