पालघर : देशात वादग्रस्त ठरलेला ‘तबलिगी जमात’चा (मरकज) मेळावा वसईमध्ये १४ आणि १५ मार्च रोजी होणारा होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द करण्याची हुशारी दाखविल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. दरम्यान, हा वसईत रद्द झालेला हा मेळावा नंतर निजामुद्दीन येथे पार पडला होता.
शमीम एज्युकेशन अँड वेल्फेयर सोसायटी, वसई या संघटनेचे सरचिटणीस अब्दुल कय्यूम अब्दुल अहमद आझमी यांनी २२ जानेवारी रोजी पालघरच्या पोलीस अधीक्षकांकडे एका पत्रान्वये वसईमधील दिवाणमानच्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. पोलीस अधीक्षकांनी कायदा सुव्यवस्था आदीची माहिती घेत या मेळाव्याला फेब्रुवारीमध्ये परवानगी दिली होती. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र किंवा राज्य शासनाकडून लॉकडाउन किंवा जनता कर्फ्यूबाबत कुठलेही आदेश नसल्याने ही परवानगी देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना सांगितले. परंतु कोरोनाचा राज्यातील अनेक भागात वाढता प्रसार पाहता मार्चमध्ये आपण या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करीत असल्याचे या कार्यक्रमाच्या आयोजकांना कळविले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करताना कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्याने आपणास परवानगी मिळावी, अशी आयोजकांची विनंती पोलीस अधीक्षकांनी लोकांच्या आरोग्याच्या पातळीवर फेटाळून लावली. कारण या कार्यक्रमाला देश-परदेशातून १५ ते २० हजार लोकांची उपस्थिती असणार होती.
मात्र जिल्ह्यासह राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे असल्याने विषाची परीक्षा का घ्यावी, असा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. हा रद्द झालेला कार्यक्रम निजामुद्दीन येथे पार पडल्यानंतर मलेशिया येथील एका महिला मौलवीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. या कार्यक्रमामध्ये परदेशातील १८ मौलवींचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे शेकडो लोकांना या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी वेळीच निर्णय घेत या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याने हा कार्यक्रम आयोजकांना दिल्लीच्या निजामुद्दीन भागात घ्यावा लागला. यामुळे पालघर जिल्ह्यात व राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा पसरणारा धोका टळला गेला.
मेळाव्याला गेलेल्या पाच जणांचा शोध
निजामुद्दीन येथे गेलेल्या पाच उपस्थितांचा पालघर पोलीस जिल्ह्यातील तुळींंज, वसई, नालासोपारा आणि इतर भागांत शोध लागला आहे. भिवंडी येथील एका व्यक्तीला वसईतील वालीव येथे शोधून काढले होते. त्यापैकी दोन जणांना वसईच्या नागरी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये दाखल केले गेले आहे, तर तिघांना घरी ठेवण्यात आले आहे. निजामुद्दीन येथे गेलेल्या आणि आतापर्यंतच्या सर्व लोकांचा शोध घेण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत. पाच जणांचा शोध घेण्यात आल्याचे सांगितले.