- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे तसेच कार व ट्रक चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी १२ गुन्ह्यांची उकल करून ३ कार, एक ट्रक, एक दुचाकी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी रविवारी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी व चारचाकी वाहने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या गुन्ह्यांना पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नालासोपाऱ्यातील एस टी डेपो रोडवर गोविंदसिंग कैलाससिंग राजपूरोहित (३९) यांच्या मालकीचे कावेरी नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ११ नोव्हेंबरला मध्यरात्री बंद ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी ग्रील आणि शटरचे कुलूप तोडून सेंटर लॉकही तोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करून नेला होता. नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दीपकसिंग उर्फ बुशिसिंग टाक (३९) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. त्याच्याकडून २ इको व १ शेव्हरलेट अश्या १० लाखांच्या तीन कार जप्त केल्या. आरोपीकडून घरफोडी, चोरी, चारचाकी वाहन चोरी असे १० गुन्ह्यांची उकल केली आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्याविरुद्ध मकोका, खून, दरोडा, घरफोडी, चोरी, विशेषतः ज्वेलर्स दुकाने चोरी, वाहन चोरी असे १० पेक्षा जास्त गुन्हे गुजरात, नवी मुंबई, ठाणे शहर, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे.
तसेच ८ मे रोजी लक्ष्मण चौहान यांचा श्रीराम नगर येथील पार्किंगमधून ५ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेला होता. पेल्हार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी फहिम अब्बास भुरे आणि दिनेश अनंता भोईर या दोघांना शनिवारी भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील ट्रक आणि वापरलेली दुचाकी हस्तगत केली असून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.