नालासोपारा (मंगेश कराळे) : दुचाकीच्या मिररला धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची नालासोपारा उड्डाणपूलावर भरदिवसा हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासादरम्यान तिन्ही आरोपींना नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आठ तासांत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केले आहे.
संतोष भवनच्या अण्णाडिस कंपाऊंड येथील श्री हरी ओम वेल्फेअर सोसायटीत राहणारा रोहित राजेश यादव (२०) आणि त्याच चाळीत राहणारा मित्र विवेक चौधरी (२३) हे दोघे एकाच दुचाकीवरून रविवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पश्चिमेककडून पूर्वेकडे ओव्हर ब्रीजवरून जात होते. ओव्हर ब्रीजवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी असल्याने रोहितच्या दुचाकीचा पुढे चाललेल्या दुचाकीच्या मिररला धक्का लागला. याचाच राग धरून त्या दुचाकीवरील आरोपी निलेश गंगाधर पुजारी (३४), पंकज अशोक बोरीचा (३०) आणि निलेश रायसाहेब सिंग (३४) या तिघांनी चेहऱ्यावर, डोक्यावर तसेच छाती व पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने रोहितचा मृत्यू झाला आहे.
सदर घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. अनोळखी आरोपीबाबत काही एक माहीती नसताना प्राप्त पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला. आरोपी निलेश पुजारी याला वरळीच्या कमला मिलमध्ये कामाला असताना पकडले तर चक्रधर नगर येथील घरातून पंकज बोरीचा आणि गाला नगरच्या नागेला तलावाच्या परिसरातून निलेश सिंगला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपारा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल सोनवणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंडित म्हस्के व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल तळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार मंगेश चव्हाण, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, अमोल तटकरे, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, जगदीश बोरसे, दीपक जगदाळे, नामदेव ढोणे, मसुब सागर तिरमले आणि पवन कदम यांनी पार पाडली आहे.
१) सदर हत्येच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन अटक केली आहे. तिन्ही आरोपींना सोमवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - चंद्रकांत जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त)