पालघर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. मात्र मागील तीन निवडणुकांतील मतांची आकडेवारी गोळा करून मतांची लाखांची बेगमी आम्हीच कशी करू शकतो, याचे दाखले देण्यास नेत्यांनी सुरूवात केली आहे. त्याचवेळी बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडॉरमुळे भरडल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनीही निवडणूक रिंगणात उडी घेणार असल्याचे जाहीर केल्याने आकडेमोडीचा खेळ रंगात आला आहे.पालघर लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ बविआकडे, दोन भाजपाकडे, तर एक शिवसेनेकडे आहे. मागील तिन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीने सरासरी सव्वा दोन लाखांच्या मतांची बेगमी केली. ज्यावेळी मोदी लाटेत चिंतामण वनगा निवडून आले होते, तेव्हाही बविआने दोन लाख ९३ हजार मते मिळवली होती. गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आयत्यावेळी उमेदवार देऊनही त्यांना ४७ हजार मते मिळाली होती.गेल्या तीन निवडणुकांत माकपच्या मतांत घट होत गेली असली, तरी त्यांची ७० ते ७५ हजारांची व्होट बँक कायम असल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत जिल्ह्यात त्यांची मते लाखाच्या घरात असल्याचे म्हटल्याने काँग्रेसप्रणित आघाडीने एकत्रित मते साडेपाच लाखांच्याघरात असल्याचा दावा केलाआहे.मोदी लाटेत युतीचे उमेदवार म्हणून चिंतामण वनगा विजयी झाले तेव्हा त्यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली होती.मागील वर्षी भाजपा, शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा त्यांनी पाच लाख १५ हजार मते मिळवली होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांनी दोन्ही निवडणुकांचा दाखला देत त्यांची मतपेढी सव्वापाच लाखांच्या घरात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मागील निकालांच्या आधारे आपापली लाखाची गोष्ट मांडण्यास सुरूवात केल्याने आदिवासीबहुल असलेल्या आणि विकासाची गंगा अजून न पोचलेल्या या भागात सध्या लाखा-लाखाची गोष्ट रंगू लागली आहे.वसई-विरारबाहेर शिट्टी वाजणार का?पालघर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची आघाडी होऊनही बहुजन विकास आघाडीला खाते उघडता आले नाही. त्यामुळे त्या पक्षाचे चिन्ह असलेली शिट्टी वसई-विरार, बोईसरबाहेर चालत नाही, अशी टीका सुरू झाली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापली चिन्हे सोडून आपल्या बालेकिल्ल्यात बविआचे चिन्ह पोचवण्याची कसरत पार पाडावी लागेल.
शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:50 AM