नालासोपारा - ऑगस्ट 2016 साली 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर चाकूने हल्ला करून नंतर लोखंडी सळई छातीत घुसवून हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून 9 आरोपीविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींना अटक केले तर चार आरोपी फरार होते त्यापैकी एका फरार आरोपीला नालासोपारा येथून वालीव पोलिसांनी गुरुवारी अटक केले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील गौराईपाडा येथील तुळशीनगर मधील नुराणी मस्जिदच्या बाजूला शब्बीरभाई यांचे किराणा दुकानासमोर 18 ऑगस्ट 2016 साली रात्री साडे आठच्या सुमारास फरदिन जिया कुरेशी (16) ही आपल्या घरी कोंबड्याना दाणे खाऊ घालत होती. त्यावेळी 9 आरोपी तिच्या घरी आले व शुभमला कुठे लपवले आहे, तो कुठे आहे असे विचारणा केल्यावर फरदिनने माहीत नसल्याचे बोलून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा राग मनात धरून तिला ठोशाबुक्यांनी मारहाण करून नंतर चाकूने उजव्या कुशीत आणि कमरेवर वार केले तर एका आरोपीने लोखंडी सळई उजव्या छातीवर भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेतील फरदिनला मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले होते व या आरोपीविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पाच आरोपींना अटक केली होती तर चार आरोपी फरार होते. तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी गेल्या 3 वर्षांपासून फरार असलेल्या मास्टर उर्फ रतन ब्रह्मदेव यादव (36) याला गुरुवारी नालासोपाऱ्याहुन अटक केली आहे.
तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:51 AM