नालासोपारा (मंगेश कराळे) :- दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींच्या त्रिकुटाला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी या आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल करून चोरीची १ रिक्षा आणि ५ दुचाकी असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
नाईकपाडा येथील शिवभिमनगर येथे राहणाऱ्या अन्वर कुरुश (२१) या तरुणाची ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली होती. त्याने ९ मार्चला रात्री मेजरवाडी येथील सलामत चिकन शॉप समोर पार्किंग केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. वालीव पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वसई विरार परिसरात मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले. वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवून सातीवली परिसरातून आरोपी रोहित राजेश सिंग, अनिल कपूर सिंग आणि मोहन हरजित सिंग यांना ताब्यात घेतले. आरोपीकडे पोलिसांनी सखोल चौकशी करून वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातून चोरी केलेल्या १ रिक्षा आणि ५ दुचाकी असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून वालीव येथील ४, तुळींज येथील १ आणि पेल्हार येथील १ असे ६ गुन्ह्यांची उकल केली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त र्पोणिमा श्रींगी-चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सैय्यद जिलानी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालादर मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.