लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- "सेव्ह ट्री, सेव लाइफ" हे ब्रीदवाक्य घेऊन वसईतील तीन साहसवीर वसई ते नेपाळ काठमांडू येथे २० ऑगस्टला सायकलवरून प्रवासाला निघाले होते. तब्बल २१०० किलोमीटरचा हा सायकल प्रवास हे तिघे २१ दिवसात पूर्ण करणार होते. मात्र या साहसी वीरांनी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच १८ दिवसांत ही मोहीम फत्ते केली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांनी नेपाळ, काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली.
ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत अशी या तिघांची नावे असून ते वसई एडवेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या विमानाने हे तिघेही मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वसई एडवेंचर फाउंडेशन तर्फे वसई ते काठमांडू अशी दीर्घ अंतराची साहसी सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. सेव्ह ट्री सेव लाइफ हा संदेश घेऊन वसई वरून हे सायकल स्वार निघाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुढे भारत-नेपाळ सीमा ओलांडून तेव्हा काठमांडू येथे पोहोचले. २० ऑगस्टला वसई येथून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता.
या मोहिमेत सायकल स्वारांनी सायकल व्यतिरीक्त कुठलेही इतर वाहन न वापरता वसई ते काठमांडू हे २१०० किमी अंतर पार केले आहे. वसई एडवेंचर फाउंडेशन ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून गिर्यारोहण, सायकलींग, साहसी शिबिरे, पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवित असून वसई तालुक्यातील कलाक्रीडा महोत्सव, वसई विजयोत्सव इत्यादी सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभागी असते.