मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकास बस डाव्या बाजूने का चालवतो सांगून बेदम मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परिवहन सेवेतील बस चालक तुळशीदास इंगोले (५२) हे भाईंदर वरून बोरिवलीची बस चालवत होते . गुरुवारी बस श्रीकांत जिचकार चौक (एसके स्टोन) सिग्नल वर आली असताना अचानक मागून तीन दुचाकी वरून स्वार आले आणि त्यांनी बसच्या समोर दुचाकी आडव्या उभ्या केल्या व बस अडवली. तिघांनी बस रस्त्याच्या डाव्या बाजूने का चालवतो, उजव्या बाजूने का चालवत नाही असे सांगून शिवीगाळ व मारहाण सुरु केली.त्यात एकाने हेल्मेटने इंगोले यांना मारहाण सुरु केली. बचावासाठी इंगोले यांनी हात पुढे केला असता मार लागून त्यांचा हात व बोट फ्रॅक्चर झाले. बसमधील प्रवाश्यांनी इंगोले यांचा बचाव करत त्या तिघा तरुणांना विरोध केल्याने इंगोले हे बचावले.
मीरारोड पोलिसांनी इंगोले यांच्या फिर्यादीवरून मोक्षेस सुरेश जैन (२९) रा. अपना अपार्टमेंट , खाऊ गल्ली , भाईंदर, हिमांशु वसंतलाल शाह (४१) रा . सुपार्श्व् दर्शन सोसायटी , व्यंकटेश पार्क , भाईंदर फाटक जवळ व आसिफ अकबर रजा ( ३४ ) रा , गीताचंद्र , गीता नगर फेज १० , भाईंदर पूर्व उड्डाणपूल जवळ ह्या तिघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना ३० नोव्हेम्बरच्या रात्री अटक केली आहे . वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर हे तपास करत आहेत.