(मंगेश कराळे)
नालासोपारा : बॅकेत पैसे भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन फसवणूक करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी ५ गुन्ह्यांची उकल करून फसवणूक केलेली काही रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे.
विरारच्या अनुसया हॉस्पिटल जवळील बापा सिताराम चाळीत राहणाऱ्या दीपक कुशवाह (२१) हा तरूण २२ जूनला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विरारच्या पंजाब नॅशनल बँकेत गेला होता. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी बॅकेत खात्यात पैसे भरण्यास मदत करा असे सांगत त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील ७६ हजाराची रोख रक्कम हातचलाखीने काढून घेत त्याची फसवणूक केली होती. विरार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासुन फसवणुकीचे गुन्हयांत वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यानी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारेे आरोपी मुस्ताक मुबारक शेख, विशाल रमेश राजभर आणि सुरज ऊर्फ प्रदिप पारसनाथ दुबे यांना अटक करून फसवणुक झालेल्या मुद्देमालापैकी २१ हजार रुपये हस्तगत केले आहे. आरोपीकडून पोलिसांनी ५ गुन्ह्यांची उकल केली आहे. या तिन्ही आरोपींवर पोलीस आयुक्तालयात व पालघर येथे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सागर सोनवणे, गणेश यादव, प्रविण वानखेडे आणि संतोष चव्हाण यांनी केली आहे.