लोकमत न्युज नेटवर्क
पालघर/बोर्डीमंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खोल समुद्रातून तीन मच्छीमारांची सुटका करून तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने डहाणू तालुक्यातील बोर्डी समुद्रकिनारी सुखरूप उतरवले. त्यानंतर बोटीवरील दोन खलाशांना दमण येथे सोडले. ही बोट रायगडच्या उरण येथील असून दमण येथून उरणला जाताना, झाई समुद्रात अपघात घडला.
तलासरी तालुक्यातील झाई समुद्रकिनाऱ्या पासून ५ ते ६ किमी अंतरावर हा अपघात घडल्याचे समजते. एमएफबी हरी ओम दत्ता साई(आयएनडी - एमएच - आय - एमएम - २९६) ही मासेमारी बोट शशिकांत जगन नाखवा(रा. करंजा, उरण, रायगड) यांच्या मालकीची आहे. दमण येथील निकुंजभाई यांनी मागितली होती. डागडूगीचा खर्च जास्त होत असल्याने, पुन्हा उरण येथे जाताना हा अपघात घडला.
बोट दगडांमध्ये अडकून त्यात पाणी भरत असल्याचे दमण पोलीस नियंत्रण कक्षाने दमण तटरक्षक दलाला माहिती दिली. या दलाच्या दमण येथील हवाई तळावरून हेलिकॉप्टरने झेप घेतली. त्यांनी साडेपाच ते पावणेसहा या दरम्यान मदतकार्य राबवून, एकूण पाच पैकी तीन खलाशांची सुटका केली. हेलिकॉप्टरने त्यांना साडेसहाच्या सुमारास बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर उतरवले. त्यांनतर घोलवड पोलिसांनी त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध केली.
तर अन्य दोन मच्छिमारांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर समुद्रात माघारी गेले. त्यांना दमण येथील तळावर सुखरूप सोडून, तटरक्षक दलाच्या वैद्यकीय पथकाने उपचार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाचही मच्छीमार दमण येथील असून त्यांना घरी सोडण्यात आले.