वसई : वसई तामतलाव येथील एका एटीएम मशीनमध्ये स्कॅनिंग चीप लावून डाटा चोरल्यानंतर बनावट डेबिट कार्डातून पैसे लाटणाºया चार जणांना मीरा रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. रिचर्ड मागो (नायजेरीयन), हिलरी किगेन (केनियन), सेड्रीक डाम्बा (युगांडा) या परदेशी नागरीकांसह उत्तर प्रदेशचा रहिवाशी असलेला कमल खान अशी त्यांची नावे आहेत.२० जानेवारीला वसईत राहणाºया अश्रफ शेख, रिया डायस, हेलेन अँड्राडीस यांच्या खात्यातून ८१ हजार ५०० रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम मीरा रोड येथील एका एटीएममधून काढण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात तामतलाव येथील एका एटीएम सेंटरमध्ये दोन परदेशी नागरीक स्कॅनिंग चीप बसवत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. तर मीरा रोड येथील एटीएम सेंटरमधून एक परदेशी नागरीक तिघांच्या खात्यातून पैसे काढीत असल्याचेही त्यातच आढळून आले होते. याप्रकरणी वसई आणि मीरा रोड पोलिसांनी तपास सुरु केला होता.मीरा रोड पोलिसांनी एका आफ्रिकन नागरीकाला अटक केल्यानंतर कार्ड क्लोनिंग करणाºया टोळीची माहिती हाती लागली होती. त्याआधारे पोलिसांनी मशिद बंदर येथील एका हॉटेलमधून रिचर्ड मागो आणि सेड्रिक डाम्बा या दोघांना अटक केली. यातील हिलरी किगेन हा नालासोपारा येथे एका भाड्याच्या घरात रहात होता. तर कमल खान हाही मीरा रोड येथे एका भाड्याच्या घरात रहात होता. त्या दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.चौघांनाही वसई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपासात चौघांनी तामतलाव येथील एटीएम मध्ये स्कॅनिंग चीप लावून डाटा चोरून मीरा रोड येथील एटीएममधून पैसे काढल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून भारतीय आणि परदेशी बँकांची अनेक कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी आणखीही कुठे असा प्रकार केला आहे काय याचाही तपास सध्या पोलीस कसून करीत आहेत.>हरिणाया कनेक्शन?१४ आणि १५ फेब्रुवारी या दोन दिवसात पन्नासहून अधिक ग्राहकांच्या खात्यातील दहा लाखांहून अधिक रक्कम हरियाणा येथील एटीएममधून काढण्यात आली होती. याठिकाणी स्कॅनिंग चीप बसवून डाटा चोरण्यात आला होता. त्यात या टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीनेही व्यापक स्वरुपाचा तपास करीत आहेत.
एटीएम क्लोनिंग करणा-या तीन परदेशी नागरिकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:16 AM