नालासोपारा (मंगेश कराळे) : तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ५५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मेफेड्रोन आणि गांज्यासह ३ नायजेरियन आरोपींना शनिवारी अटक करण्यात यश मिळाले आहे. तिन्ही आरोपींना अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळींजचे पोलीस शिपाई सगळे यांना शनिवारी सकाळी दोन नायजेरियन प्रगती नगरच्या सद्गुरू कृपा अपार्टमेंटच्या टेरेसवर अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. तुळींजचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी कारवाई करण्याचे आदेश देऊन पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. त्या इमारतीच्या रूम नंबर ४०१ मध्ये असलेले नायजेरियन ओमेकोसी चिबुझा डाकलाने (३८), नवोबासी चिबुजे (३८) आणि ओंये इकेना बेन्थ (३६) या तिघांची पोलिसांनी झडती घेतली. त्यांचे अंगझडतीमध्ये ५५ लाख ४० हजार २०० रुपये किंमतीचा ५५४.०२ ग्रॅम मेफेड्रोन आणि ५२ हजारांचा २.३६० किलो ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ५५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. तुळींज पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात एनडीपीएस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. चहाण, सपोनि म्हात्रे, सपोनि पाटील, पोउपनिरी केंगार, पोउपनिरी बांदल, पोहवा केंद्रे, पोहवा गायकवाड, पोहवा धरता, पोशि छपरीबन, पोशि झांझुर्ने, पोशि पिंगळे, पोशि हाके, पोशि कदम, पोशि सगळे, मपोहवा मेहेर, मसुब मुंडे, अहिरे यांनी पार पाडली आहे.