पंकज राऊत बोईसर : येथील गायत्री मार्केटिंगच्या भेट वस्तू योजनेमध्ये मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या नऊ जणांपैकी तिघांना बोईसर पोलिसांनी अटक केली. त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य सहा जणांच्या लवकरच मुसक्या पोलीस आवळणार आहेत.येथील ओस्तवाल एम्पायरमध्ये कार्यालय थाटून गुजरातच्या सहा व डहाणूच्या तीन जणांनी एकत्र येऊन भेट वस्तू योजना सुरू केली. परंतु या योजनेतील विजेत्यां व्यतिरिक्त सुमारे ८ हजार ग्राहकांना १३ हजार २५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतरही कोणतीच वस्तू मिळाली नसल्याने त्यांनी बोईसर पोलीस स्थानकात २६ नोव्हेंबर २०१७ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर या योजनेच्या संचालकांच्या मालमत्ता, ठावठिकाणा व इतर बाबीची माहिती व पुरावे पोलीस गोळा करीत होते.यासंदर्भात लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांनी या प्रकरणातील आरोप असलेले रविंद्र बारी, हर्षद बारी, राजेश वझे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झालेल्यांपैकी आत्तापर्यंत एक हजार ७८५ सभासदांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.
गायत्री घोटाळ्यातील तीन संचालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:23 AM