पालघर/तलासरी/कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ‘आकाश’च्या मालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १ लाख १० हजारांची रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासांत अटक करण्यात पालघर पोलिसांना यश मिळाले आहे. या कामी उत्कृष्ट कार्य करणाºया पोलिसांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.
कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या धुंदलवाडीजवळील हॉटेल ‘आकाश’मध्ये बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास २० ते २२ वयोगटातील तीन तरुण जेवण करण्यास आले. जबरी चोरी करण्याचा डाव असल्याने जेवण करता करता त्यांनी हॉटेलमधील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. जेवण आटोपल्यानंतर त्या तीन इसमांपैकी एकाने बाहेर जात आपली कार सुरू केली, तर हॉटेलमध्ये असलेल्या अन्य दोन तरुणांनी हॉटेलचे मालक नितेश यादव (३०) यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून त्यांच्याकडील १ लाख १० हजाराची रक्कम घेऊन पळून जाऊ लागले. या वेळी मालकाने आरडाओरड केल्याने हॉटेलमधील वेटर आणि जवळच असलेल्या ट्रकमधील चालक मदतीला धावले. दोन्ही आरोपी आपल्या गाडीकडे धाव घेताना उपस्थितांनी कारचालकावर हल्ला चढवीत गाडीची चावी काढून घेतली. आपल्याला घेरण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यातील एकाने आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून तीन राऊंड फायर केले. त्यामुळे उपस्थित सर्व जण थोडे मागे हटले. ही संधी साधीत तीनही आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, डहाणूचे मंदार धर्माधिकारी, बोईसरचे विश्वास वळवी यांच्या सहकार्याने १२० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीम बनवून परिसरात नाकाबंदी केली. घटनास्थळी मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अवघ्या चार तासांत पकडण्यात यश मिळवले.काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या ताब्यातघटनास्थळी दोन काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या आरोपींवर मध्य प्रदेशमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याच्या सिद्धवा जायभाये या करणार असून या प्रकरणी उत्कृष्ट तपास करणाºयांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.