राज्यात शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. वसईत दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जनावेळी एका कुटुंबाकडून एक चूक झाली आणि त्यानं संपूर्ण कुटुंबीय चिंतेत सापडले होते. पण बाप्पानं जाता जाता पाटील कुटुंबीयांसमोर निर्माण झालेलं 'विघ्न' दूर केलं आहे. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना पाटील कुटुंबीयांचा साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकूट हरवला होता. बाप्पाच्या विसर्जनावेळी सोन्याचा मुकूट देखील पाटील कुटुंबीयांकडून चुकून विसर्जित झाला होता. पण १२ तासांच्या शोधानंतर मुकूट सापडला आणि पाटील कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
वसईतील पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाची उत्साहात बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. पण घरी सुतक पडल्यानं पाच दिवसांच्या बाप्पाचे दीड दिवसात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी घाईघाईत साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मुकूट देखील विसर्जित झाला होता. या मुकुटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये इतके होती. १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाप्पाचं मुकूट सापडला आणि बाप्पा पावल्याचं समाधान पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केलं.