राहुल वाडेकरविक्रमगड : राजस्थान, तसेच महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित होणाऱ्या भटक्या कुटुंबांतील लहानग्या मुला-मुलींच्या जोरावर दोन टेकूचा आधार असलेल्या एका दोरीवर चित्तथरारक कवायती करणाऱ्या डोंबारी समाजावर शहरात फुगे विकण्याची वेळ आली आहे. कोरोनाने या समाजाचा आर्थिक कणा खिळखिळा केल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावली असल्याचे ते सांगत आहेत.
दरवर्षी थंडीचा हंगाम सुरू झाला की, डोंबारी समाज मोठ्या शहरांकडे जाऊन दोरीवरचे साहसी खेळ दाखवून पोटाची खळगी भरावी, या उद्देशाने स्थलांतर करतात. पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, भिवंडी आदी मोठ्या शहरांत यांचे मोठे स्थलांतर होते. या भागांमध्ये एखादी जागा पाहून तेथे समूहाने ते आपले तात्पुरते बस्तान वसवतात.
रोज सकाळी उठून कुटुंबासह बांबूच्या काठ्या, दोरखंड, ढोलकी व एक लहान ध्वनिक्षेपक घेऊन ते शहरातील वर्दळीच्या ठिकाणी चित्तथरारक साहसी कवायती दाखवत असतात. हा खेळ पाहून पादचारी प्रेक्षक खूश होतात व त्यांना पैसेही मिळतात. या पैशांवर ते उदरनिर्वाह करतात. १० ते १५ दिवसानंतर, ते पुढील शहराकडे आपले बस्तान हलवतात. मात्र सध्या काठीला शेकडो फुगे बांधून ती काठी खांद्यावर घेऊन दुसऱ्या हातात आपल्या मुलाचा हात पकडून अशा रितीने ही कुटुंबे आता शहरात फुग्यांची विक्री करताना दिसत आहेत.