आज जिल्ह्यात ३९,१५२ बाप्पांची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:25 AM2018-09-13T03:25:42+5:302018-09-13T03:25:54+5:30
गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठा तुडूंब भरल्या आहेत.
पालघर : गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठा तुडूंब भरल्या आहेत. पालघर, वसई, विरार तसेच बोईसर व वाड्याच्या मुख्य बाजारपेठेमध्ये दुपारनंतर फुल, पुजेचे सामान व मखर खरेदीसाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू या ग्रामिण भागामध्ये गणपतीच्या आदल्या दिवशीच खरेदीचा परिपाठ असल्याने तेथेही चांगलीच खरेदी विक्री झाली.
जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सुरु होत असून तेराशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आॅनलाईन नोंदणी झाली असून ३७,८५२ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. हा उत्सव निविघ्नपणे पार पडावा म्हणून १२२ पोलीस अधिकारी, १३६५ पोलीस कर्मचारी, १ एसआरपीएफ कंपनी तसेच साडेतिनशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर आणि ग्रामीण भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यासाठी आगमनाच्या गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यामध्ये दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेश विसर्जनाचाही समावेश आहे.
सार्वजनिक मंडळांनी नियमांच्या अधीन राहून आपल्या उत्सवामुळे कोणालाही त्रास होणार नाही, अशा तºहेने सहकार्याच्या भावनेतून
उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांनी केले आहे.
>गणेशोत्सव आणि मोहरम सणांसाठी वसईमध्ये पोलीस सज्ज
वसई : आज श्री गणपती उत्सव आणि येणाऱ्या मोहरम सणाच्या पाशर््वभूमीवर वसई तालुक्यातील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज झाली असून पाचशे हुन अधिक पोलीस बळ यावेळी तालुक्यात ठिकठिकाणी तैनात झाले आहेत. वसईत या दोन्ही उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो समाजकंटकावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे अपर पोलीस अधीक्षकांनी सागितले.
दुसरीकडे वसई तालुक्यात एकूण ८३१ सार्वजनिक आणि २२ हजारच्या आसपास घरगुती गणपतीचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने वसई तालुक्यात तब्बल ५०० हुन अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे तैनात केले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. यासाठी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोहल्ला शांतता कमिटीच्या मिटिंग घेऊन समाजातील प्रतिष्ठीतांना आवाहन करण्यात आले आहे.त्यादृष्टीने अप्पर वसई पोलीस अधीक्षक यांच्याकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. वसई तालुक्यात शांतता व कुठे ही उत्सवाला गालबोट लागू नये त्याकरता तालुक्यात एकूण ४९८ हुन अधिक पोलीस अधिकारी -कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात झाला आहे. यामध्ये ४६ पोलीस अधिकाºयांमध्ये १ अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ३ पोलीस उपाअधीक्षक,७ पोलीस निरीक्षक, उर्विरत सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश असून तब्बल ४४८ महिला -पुरु ष पोलीस कर्मचारी आहेत, तर दंगल नियंत्रण पथक आणि राखीव पोलीस दल यांच्या प्रत्येकी तीन-तीन तुकड्या सज्ज आहेत. आणि पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त असा ५० पोलीस अधिकारी -कर्मचारी वर्ग ही बंदोबस्तासाठी वसईत रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, वसई तालुक्यात अकरा दिवसांचा गणेशोत्सव आणि मुस्लिम बांधवांचा मोहरम सण अंत्यंत शांततेत पार पडण्यासाठी पालीस यंत्रणा सुसज्ज आहे.