पारोळ : वसई माघी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून आता बाप्पाच्या आगमनाची धूम मराठी माघ महिन्यात जल्लोषात साजरी होऊ लागली आहे. यंदा माघी गणेशोत्सव मंगळवार, दि. २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. या वर्षी वसई-विरार परिसरात घरगुती ९१३ तर सार्वजनिक ४३ बाप्पांचे आगमन होणार आहे.वसई-विरारची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बाहेरगावाहून कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी स्थायिक झालेले नागरिक धार्मिक श्रद्धेपोटी आॅगस्ट आणि मराठी माघ महिन्यात बाप्पांची घरी आरास केलेल्या मखरात प्राणप्रतिष्ठापना करतात. यंदा मंगळवारपासून बाप्पांचा उत्सव साजरा होत असून तालुक्यात सार्वजनिक मंडळांनी मखरांची आरास केली आहे. माघी गणेशोत्सवात नवस केलेल्या बाप्पांची संख्या अधिक असते. बाप्पासमोर एखादा बोललेला नवस पूर्ण झाला की बाप्पांची पाच वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठापना केली जाते.या वर्षी वसई तालुक्यात ९५६ बाप्पांचे आगमन होणार आहे. यात ४६ सार्वजनिक तर ९१३ घरगुती बाप्पा असतील. माघी गणेशोत्सव असला तरी काही भाविक दीड दिवसांसाठी, अडीच दिवसांसाठी किंवा पाच दिवसांसाठी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करतात. सार्वजनिक मंडळांकडून या काळात भाविकांसाठी खास मनोरंजनपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
आजपासून माघी गणेशोत्सवाची धूम; ९५६ गणरायांचे आज आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:53 AM