पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. रविवारी होणाऱ्या आपल्या दोन जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्री जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काय भाष्य करतात आणि कोणत्या मुद्यांवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवतात, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.आतापर्यंत राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक म्हणून एकहाती किल्ला लढवून विजयश्री खेचून आणणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभांनी भाजपच्या निवडणुक प्रचार मोहिमेत रंग भरले जाणार आहेत. रविवार दिनांक २० मे रोजी सकाळी अकरा वाजता चारोटी नाका येथील आचार्य भिसे विद्यालय ग्राऊंडवर मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता नालासोपारा पुर्वेला गाला नगर येथे त्यांची दुसरी सभा होणार आहे. या सभांमध्ये ते काय बोलतात याकडे भाजपसोबतच इतर पक्षांच्या नेते मंडळीचे लक्ष आहे.विशेष करून पालघर पोटनिवडणुकी पूर्वी शिवसेनेने आपल्या राजकीय फायद्यासाठी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांची जी दिशाभूल केली, त्याबाबत मुख्यमंत्री प्रखर भाष्य करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शिवाय पालघर हा नव्याने अस्तित्वात आलेला जिल्हा असल्याने प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा ते करतील असाही अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभांच्या नियोजनाबाबत विचारले असता महाराष्ट्राचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून हा समाज घटक कायमच विकासाच्या परिघाबाहेरच राहिला आहे. नव्या जिल्हा रचनेनंतर या समाज घटकासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे.फडणवीस भाजपासाठी ठरतात लकीरविवारी मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात आगमन होत असून पालघरवासीय त्यांचे जोरदार स्वागत करतील यात शंकाच नाही. तसेच मुख्यमंत्री आतापर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात सहभागी झालेत, तिथे भाजपने जबरदस्त विजय मिळवले आहेत. आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते सहभागी होत असल्याने इथेही आमचा विजय पक्का असल्याचे मा. चव्हाण म्हणाले.
आज मुख्यमंत्री घेणार विरोधकांचा समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:05 AM