लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे . एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यातील पोलीस कोरोनाग्रस्त झाले असून ते रुग्णालयात व कोविड केअर मध्ये उपचार घेत आहेत .
शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . त्या भागातील लोकं लॉकडाऊनचे पालन करत नाहीत म्हणून सुरवातीला तक्रारी असत . परंतु नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे सह पोलिसांनी नया नगर मध्ये विविध उपायोजना आणि कारवाई करून लॉकडाऊन काटेकोर अमलात आणले . जेणे करून नया नगर भागात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्य झाले होते .
परंतु या आठवड्या भरात नया नगर पोलीस ठाण्याचे एका पाठोपाठ एक असे तब्बल 18 पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत . स्वतः बर्वे यांच्या सह अन्य तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 14 पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लग्न झाल्याचे चाचणी अहवालातून निष्पन्न झाले आहे . एकाच वेळी इतके पोलीस कोरोनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
आधीच पोलीस ठाण्यातील पोलीस बळ 80 इतके कमी असताना त्यात १८ पोलीस अधिकारी व कमर्चारी कोरोना मुळे कर्तव्यावर हजर राहू शकणार नाहीत . त्यातच लॉकडाऊन खुले केल्याने लोकां कडून निर्देशांचे होणारे उल्लंघन आदींवर नियंत्रण ठेवणे अवघड जाणार आहे . तर हे सर्व पोलीस लवकरच कोरोनातून बरे होऊन परत सेवेत यावेत अश्या सदिच्छा व्यक्त होत आहेत . या आधी देखील 13 पोलीस कोरोनाग्रस्त झाले होते . त्यामुळे नया नगर पोलीस ठाण्यातील आता पर्यंत एकूण 31 पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत .