हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवावी ह्या मागणी साठी मातोश्री वर गेलेल्या पालघरच्या पदाधिकाऱ्यांना तूर्तास ‘वेट अँड वॉच’ च्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.राज्यात भाजप आणि शिवसेने मधील संबंध दिवसेंदिवस बिघडत असून सेनेने आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पालघर जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत उपाध्यक्ष पदाच्या निवडी सह पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठीही सेनेला उपाध्यक्ष पदासह कृषी व पशुसंवर्धन सभापती पद देण्याचे मान्य करूनही भाजपने ऐन वेळी घुमजाव करीत सभापती पद नाकारले होते. तसेच, आदिवासी विकास मंडळाच्या समित्यासह, प्रदूषण आदी विविध समित्यामध्ये सदस्य पदांच्या जागा साठीही पालकमंत्र्यासह भाजप पदाधिकाºयांनी शिवसेनेला डावलले होते. भाजपच्या या भूमिके मुळे शिवसैनिक प्रचंड संतापले असून याचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत.पालघर लोकसभेच्या निवडणुकीसाठी सेनेने भाजपशी कुठलीही युती न करता स्वतंत्र उमेदवार देऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी घेऊन जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, वैभव संखे आदी शेकडो पदाधिकाºयांनी रविवारी दुपारी उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पालघर, वाडा, जव्हार नगर पालिकांसह पंचायत समित्या, ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व असून स्वबळावर लढण्याची मागणी केली. सर्व पदाधिकारी एकत्र जमल्याचे समाधान उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करीत मला दोन दिवस द्या आपण भाजपशी युती करणार नसून सर्व बाबी तपासून दोन दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मातोश्रीकडून तूर्तास ‘वेट अॅण्ड वॉच’, दोन दिवसांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:48 AM