नालासोपारा : कोरोनाच्या विळख्यात वसईतील पर्यटन कंपन्याही अडकल्या आहेत. सर्वच सहली रद्द झाल्यामुळे या कंपन्या दिवाळखोरीच्या वाटेला लागल्या आहेत. शालान्त परीक्षा संपून सुट्यांचा हंगाम सुरू होईल तसा मुंबई, वसई आणि जवळपासच्या परिसरातील लोकांचा पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळेल. या आशेने सहल कंपन्यांनी डिसेंबर-जानेवारीपासून नियोजनास सुरुवात करून तयारी केली. या सर्वांवर कोरोनाच्या जागतिक संकटाने पाणी फिरले आहे.
देश-विदेशांतील सहली, तीर्थयात्रा, सिनीयर सिटीझन्स टूर्स, पॅकेज टूर्स, समूह सहलीसाठी मार्गदर्शन करून सेवा-सुविधा या कंपन्या देतात. पर्यटन क्षेत्रात आधीच तीव्र स्पर्धा आहे. मात्र, पारंपरिक ग्राहक याच पर्यटन कंपन्यांकडे येतात. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक ओढाताण, नैसर्गिक आपत्ती, राजकीय व प्रादेशिक आंदोलने अशा प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या पर्यटक कंपन्या कोरोनामुळे पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. सगळीकडे बुकिंगच्या रकमा भरल्या होत्या. विमान, बस, रेल्वे व इतर सोयीसाठी आगाऊ रक्कम भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा अडकून पडला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे संचालक हवालदिल झाले आहेत.महामारीच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नाहीत आणि टाळेबंदीच्या कालावधीत सतत वाढच होत आहे. यामुळे या व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. मदत मागायची तरी कुणाकडे? केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन लवकर हालचाल केली नाही, तर हा उद्योग मरणावस्थेत पोहोचेल आणि आत्मनिर्भरता या घोषणेचा उद्देश असफल होईल.- रिक्सन तुस्कानो, पर्यटन कंपनीचे संचालक