अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यासह विविध समुद्र पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढता असून त्यांच्याकडून कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. यामुळे स्थानिकांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुंबई-ठाण्यासह अन्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात अन्य ठिकाणांएवढी स्थिती नसली, तरी प्रशासनाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून डहाणू शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही धाडसत्र सुरू करून नियमांना बगल देणाऱ्यांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.शुक्रवारी शिवजयंती उत्सवाची सार्वजनिक सुट्टी आणि त्यानंतर वीकेण्ड आला. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटकांचा ओघ वाढून चौपाट्यांवर गर्दी होताना दिसली.
डहाणू तालुक्यातील चौपाट्यांना मुंबई, उपनगरे, ठाणे तसेच लगतच्या गुजरात आणि केंद्रशासित प्रदेशांतून येणाऱ्या पर्यटकांकडून प्राधान्य दिले जात आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या तुरळक आहे.
परंतु, मुंबईसह आणि उपनगरांत रुग्णांच्या संख्येतील वाढ अधिक आहे. त्यामुळे शासनाने कोविड नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले असून विनामास्क नागरिकांवर २०० रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, परगावांतील पर्यटक तालुक्यातील बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, आगर, पारनाका इ. पर्यटन स्थळी येऊन धम्माल करीत आहेत.
मुंबईसह अन्य भागात काही दिवसांपासून रुग्ण वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे अविवेकी पर्यटक प्रशासनाची डोकेदुखी ठरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यंत्रणेला आदेश दिलेले असल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यटनस्थळी भेटी देऊन बेफिकीर पर्यटकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातही धाडसत्र सुरू करून कारवाईची गरज व्यक्त होत आहे.